Belagavi

चारुकीर्ती श्रींचे बेळगावात प्रथमच आगमन; जैन समाजाकडून भव्य स्वागत

Share

श्रवणबेळगोळ येथील जगद्गुरू स्वस्तीश्री चारुकीर्ती पंडिताचार्यवर्य महास्वामी यांचे १५ नोव्हेंबर रोजी प्रथमच बेळगावात आगमन झाले. यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

जुन्या पी. बी. रस्त्यावरील पॅटसन संस्थेजवळ दुपारी चार वाजता महास्वामींचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी जैन समाजाचे नेते भरत पाटील आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील व त्यांच्या पत्नी यांनी महास्वामींची पादपूजा केली. आमदार संजय पाटील, भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव विनोद दोड्डण्णवर, वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनमण्णवर यांच्यासह समाजातील मान्यवरांनी पुष्पार्पण करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.

यानंतर महास्वामी सुशोभित रथात विराजमान झाले. तेथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. बेळगाव शहर आणि परिसरातील ३३ महिला मंडळांच्या सदस्यांनी धार्मिक घोषणांसह शोभायात्रेत सहभाग घेतला. घोडे, विविध वाद्यपथके, लेझीम आणि कोलाट पथकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

जुन्या पी. बी. रस्त्यापासून सुरू झालेली शोभायात्रा बहोसूर बसवण गल्ली, शाहापूर कोरे गल्ली, गोवावेस, महावीर भवन आणि हिंदवाडीमार्गे गोमटेश विद्यापीठात पोहोचली. तेथे अर्पण कार्यक्रम आणि मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले.

Tags: