Belagavi

पतीचा मृतदेह घेऊन फुटपाथ वर बसलेल्या महिलेला माजी महापौरांनी केली मदत

Share

बेळगावातील फुटपाथवर जीवन व्यतीत करणाऱ्या वारकरी दाम्पत्यावर दुःखाचा प्रसंग ओढवला. पतीचे निधन झाल्यानंतर पत्नी त्यांचा मृतदेह घेऊन फुटपाथवर असहायपणे बसली होती. अशा परिस्थितीत माजी महापौर विजय मोरे यांनी मदतीचा हात देत अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील हे दाम्पत्य गेल्या महिनाभरापासून बेळगावातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील फुटपाथवर वास्तव्यास होते. पतीचे निधन झाल्यानंतर मदतीला कोणीही नसल्याने पत्नी मृतदेहाशेजारी बसून रडत होती. याची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी माजी महापौर विजय मोरे यांना कळवले.

विजय मोरे यांनी सोशल रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. बेळगाव महानगरपालिकेचे शववाहिका कर्मचारी निशार संषर, संजय मेत्री आणि स्मशानभूमी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या कार्यात गंगाधर पाटील, पद्मप्रसाद हुगळी, अॅलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, राजू टक्कर, शशिकांत अंबेवाडकर आणि शामसिंग राजपूत यांनी सहभाग घेतला. पतीच्या निधनाने दुःखात असलेल्या महिलेचे सांत्वन करून तिला अंत्यविधीसाठी मदत करण्यात आली. तसेच तिला सुरक्षितपणे छत्रपती संभाजीनगर येथील तिच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.

Tags: