निरोगी आरोग्यासाठी धावपटूंनी धावपटूंसाठी २९ नोव्हेंबर रोजी हिंडाल्को ‘हमारा बेळगाव मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे, अशी माहिती डॉ. कीर्ती यांनी दिली.
शनिवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पर्यावरणाचे संरक्षण करण्याबरोबरच बेळगावकरांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने मॅरेथॉनच्या माध्यमातून १६ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

धावण्याची संस्कृती रुजविणे आणि आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सीआरसी स्पोर्ट्सच्या पुढाकाराने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील क्रीडा आणि फिटनेसप्रेमी, अनुभवी धावपटू, एलिट मास्टर्स खेळाडू तसेच कुटुंबे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
रनिंग टीम बेळगावच्या वतीने रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. येळ्ळूर येथील केएलई संस्थेच्या मागील बाजूस असलेल्या सीआर-७ स्पोर्ट्स अरेना येथून धावण्यास प्रारंभ होणार असून, येळ्ळूर, राजहंसगड आणि यरमाळ मार्गे ही मॅरेथॉन पार पडणार आहे. देशाच्या विविध भागांतून सुमारे एक हजार धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
चेतन कटोवकर यांनी सांगितले की, ‘निसर्गाच्या संवर्धनासाठी धावा’ या ध्येयवाक्याखाली आयोजित या मॅरेथॉनचा उद्देश पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण मोहीम, निरोगी जीवनशैली आणि क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. हिंडाल्को हे या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक असून, ग्रीन सेव्हियर्स ही स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था म्हणून काम पाहणार आहे.
पाच गटांत धावण्याच्या स्पर्धा
फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर फन रन व वॉक अशा पाच गटांत स्पर्धा होणार आहेत. विविध वयोगटांतील विजेत्यांना रोख पारितोषिके आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण तीन लाख रुपयांची रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
पत्रकार परिषदेला जगदीश शिंदे, अनंत टिप्पण्णावर, नीती चौगुले, महेश शेट्टी आणि रवी काळे उपस्थित होते.


Recent Comments