बेळगावात झालेल्या सर्वेश कंग्राळकर हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. घटनेला अनेक महिने उलटूनही प्रमुख संशयित तरुणीसह फरार आरोपींना अटक झाली नसल्याचा आरोप करत मृताच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
२३ सप्टेंबर रोजी झालेल्या या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित श्रेया जगदाळे हिला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही, असे मृताचे नातेवाईक रोहित भरमाप्पा तळवार यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, घटनेच्या अवघ्या १५ दिवस आधी इन्स्टाग्रामवरून तरुणीची सर्वेशशी ओळख झाली होती. घटनेच्या रात्री तिने संदेश पाठवून सर्वेशला भेटण्यासाठी बोलावले आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक झाली असली, तरी संबंधित तरुणीसह अन्य तीन आरोपी फरार आहेत. न्यायालयात हजर झालेल्यांचीही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

घटनास्थळी बूट सापडूनही पोलिसांना ते सापडले नसल्याचे सांगून सत्य लपवले जात असल्याचा आरोपही रोहित यांनी केला. प्रमुख आरोपींच्या अटकेबाबत विचारणा केल्यास पोलीस केवळ ‘शोध सुरू आहे’ असे उत्तर देत असल्याचे त्यांनी सांगितले. फरार प्रमुख संशयित तरुणीसह अन्य आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि मृताच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments