दिगंबर जैन मठ, श्रवणबेळगोळचे पीठाधीश जगद्गुरू स्वस्तिश्री अभिनव चारुकीर्ती पंडिताचार्यवर्य भट्टारक पट्टाचार्यवर्य महास्वामीजी रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रथमच बेळगाव नगरीला भेट देणार आहेत. या निमित्ताने बेळगावमध्ये ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कर्नाटकातील प्रमुख जैन तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्रवणबेळगोळाला दोन हजार वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास लाभला आहे. विंध्यगिरी पर्वतावरील भगवान बाहुबलींची ५७ फूट उंच अखंड पाषाणातील भव्य गोम्मटेश्वर मूर्ती हे या क्षेत्राचे प्रमुख आकर्षण असून, तिची प्रथम प्रतिष्ठापना इ.स. ९८१ मध्ये करण्यात आली होती.

महास्वामीजींचा *मंगलपुर प्रवेश* हा शुभ स्वागत सोहळा समस्त जैन समाज, बेळगाव यांच्या वतीने दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याची मिरवणूक जुना पी.बी. रोडवरील पिंपळ कट्टा (पॅटसन मोटर्ससमोर) येथून सुरू होऊन होसूर, कोरे गल्ली, गोवावेस आणि महावीर भवन मार्गे हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठ परिसरात पोहोचणार आहे. या मिरवणुकीत विविध वाद्यवृंदांची सादरीकरणे, ३३ महिला मंडळांचा सहभाग तसेच विविध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण असणार आहे.
गोमटेश विद्यापीठ येथे आयोजित स्वागत कार्यक्रमात गोम्मट स्तुती, महास्वामीजींचे औपचारिक स्वागत, दीपप्रज्वलन, महास्वामीजींचा परिचय, पादपूजा आणि अष्टद्रव्य पूजा हे धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर महास्वामीजींचे आशीर्वचन आणि अन्य पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होतील.
यावेळी पूज्य महास्वामीजींचा सन्मान करण्यात येणार असून, उपस्थितांना त्यांचे मंगल आशीर्वाद लाभणार आहेत.
सन २०२३ मध्ये श्रवणबेळगोळ येथील प्राचीन आणि प्रतिष्ठित दिगंबर जैन मठाचे पीठाधीश्वर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महास्वामीजींची ही पहिलीच बेळगाव भेट असल्याने जैन समाजासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण क्षण आहे.
या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्यात जैन बांधवांनी, भाविकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा प्रसंग संस्मरणीय करावा, असे आवाहन समस्त जैन समाज, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Recent Comments