शेतकऱ्यांच्या जीवनात मोलाचे स्थान असलेल्या म्हशींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेळगावमध्ये दिवाळी पाडव्याला पारंपरिक म्हशींचा सण साजरा करण्यात आला. यानिमित्त म्हशींना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

बेळगावमध्ये दिवाळी पाडव्याला म्हशींना सजवून त्यांची पूजा करण्याची आणि मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या जनावरांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. यासाठी म्हशींना आठवडाभर आधीपासून सजवण्याची तयारी केली जाते. त्यांची स्वच्छता करून शिंगांना रंग देण्यात येतो. तसेच घुंगरांच्या माळा, घंटा आणि विविध अलंकारांनी त्यांना सजवले जाते.


चव्हाट गल्लीमध्ये सजवलेल्या म्हशींची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुचाकींच्या सायलेन्सरचा आवाज करत तरुण म्हशींच्या पुढे जात होते. त्या आवाजाच्या दिशेने म्हशी धावू लागल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. काही तरुण म्हशींसमोर घोंगडी फिरवत होते.

माजी आमदार अनिल बेनके यांनी या परंपरेचे कौतुक केले. आधुनिक काळातही तरुण पिढी या परंपरेत उत्साहाने सहभागी होत असून, त्यामुळे ती पुढील पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.

चव्हाट गल्लीसह कॅम्प, टिळकवाडीतील गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, गांधीनगर, वडगाव, कोनवाळ गल्ली, फूलबाग गल्ली, तहसीलदार गल्ली, कामत गल्ली, पांगुळ गल्ली आणि शुक्रवार पेठ आदी भागांतही हा उत्सव साजरा करण्यात आला. म्हशींची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


Recent Comments