समाजात फूट पाडण्याचे काम इतरांनी करावे; मात्र सुईप्रमाणे समाजाला जोडण्याचे काम आमचे सरकार करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले. धर्म वेगवेगळे असले तरी मानवता हाच सर्वांचा समान धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.

बेंगळुरू येथील पुट्टण्णा चेट्टी सभागृहात कर्नाटक उर्दू अकादमीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ‘देव एक, नावे अनेक’ याप्रमाणे जात-धर्मापेक्षा मानवधर्म श्रेष्ठ असल्याचे त्यांनी नमूद केले. उर्दू ही केवळ संवादाचे माध्यम नसून हृदयाच्या गाभ्यातून उमटणारी ज्ञानाची भाषा असल्याचे त्यांनी सांगितले.


दसरा शायरी कार्यक्रमाचा उल्लेख करत उर्दू भाषेचा आनंद सर्व समाजांतील लोक घेतात, असे ते म्हणाले. उर्दू अकादमीला अधिक अनुदान देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

काँग्रेस पक्षाने देशाला राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि संविधान दिले असून, संविधानाच्या चौकटीत सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. द्वेष पसरवणाऱ्यांच्या वक्तव्यांना थारा न देता जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार अल्पसंख्याकांसह सर्व समाजघटकांना पूर्ण संरक्षण आणि सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती यू. टी. खादर, आमदार रिझवान अर्शद, एन. ए. हॅरिस, मन्सूर अली खान आणि उर्दू अकादमीचे अध्यक्ष मोहम्मद अली काझी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments