मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिल्याच्या रागातून ज्योतिषाची हत्या करण्यात आल्याची घटना निपाणी तालुक्यातील मानकापूर गावाजवळ घडली. या प्रकरणी सदलगा पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.
महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील मंदार अजित रांडे यांची हत्या करण्यात आली. बाबासो दीपक मकदूम याने हा खून केल्याचा आरोप आहे. याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी माहिती दिली.

१३ जानेवारी रोजी आरोपीची मुलगी घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिने आंतरजातीय विवाह केला होता. हा विवाह ज्योतिषी मंदार रांडे यांनी लावून दिल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातूनच त्याने हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
३० ऑक्टोबर रोजी विवाहाचा मुहूर्त ठरवायचा असल्याचे सांगून आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून ज्योतिषी रांडे यांना फोन केला. मुहूर्ताबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना निपाणी तालुक्यातील मानकापूर येथे बोलावले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपी बाबासो दीपक मकदूम याला अटक केली.


Recent Comments