चिक्कोडी तालुक्यातील मानकापूर येथे शेतात दिवसाढवळ्या झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांत छडा लावण्यात सदलगा पोलिसांना यश आले आहे. पुरोहित मंदार रानडे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथील बाळासो अण्णासो मगदूम (४५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी येथील रहिवासी मंदार रानडे (३४) हे दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. मानकापूर येथील शेतात त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीच्या मुलीने अलीकडेच आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहासाठी मंदार रानडे यांनी मदत केल्याचा संशय आरोपीला होता. याच रागातून त्याने रानडे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेनंतर सदलगा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार दिवसांत आरोपीला अटक केली. सीपीआय विश्वनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बसनगौडा नेरळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकात एएसआय शंकर बाडकर, संजय जमकोळी, संतोष बडोदे, उदय कांबळे आणि विठ्ठल हळबर यांचा सहभाग होता.


Recent Comments