Belagavi

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

Share

कन्नड राज्योत्सवानिमित्त बेळगाव शहरात आजपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होत असून, लाखांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


बेळगाव शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शहराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या चन्नम्मा सर्कल येथे विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले असून, स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करण्यास सांगितले आहे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्री १०:३० वाजता ध्वनिवर्धक आणि डीजे पूर्णपणे बंद करण्याचे तसेच प्लाझ्मा आणि लेझर लाईट्सच्या वापरावर घालण्यात आलेली बंदी काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

दुसऱ्या बाजूला डीसीपी नारायण बरमनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चन्नम्मा सर्कल येथे रात्री १ वाजेपर्यंत स्थानिक आयोजक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण आणि पूजन कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी जिल्हा क्रीडांगणावर परेड पार पडल्यानंतर भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात येईल. सुमारे १ ते १.५ लाख नागरिक एकत्र येण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Tags: