Belagavi

आरटीओ कार्यालयात एजंटांचा वावर आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

Share

बेळगावच्या शिवाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) अचानक भेट देऊन कामकाजाची तपासणी केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची उपस्थिती, वाहन नोंदणी आणि परवाने आदींची कागदपत्रे तपासली.

कार्यालय परिसरात वाहन परवाना किंवा नोंदणीच्या कामासाठी एजंट आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

महापालिका हद्दीत दैनंदिन वापरासाठी नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमानुसार पुनर्नोंदणी न झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवर परिवहन विभागाने आतापर्यंत कारवाई न करणे गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तातडीने मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात लोकायुक्त प्रकरण दाखल केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुनर्नोंदणी न केलेली शालेय वाहने तातडीने जप्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात मोठ्या संख्येने अनधिकृत वाहने धावत असल्याचे आढळले असून, त्यांचा शोध घेऊन कोणतीही सवलत न देता जप्तीची कारवाई करावी. सार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक नियमांच्या पालनासाठी अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Tags: