Belagavi

मागण्या पूर्ण न झाल्यास ‘कर्नाटक बंद’: शशिकांत गुरुजींचा इशारा

Share

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रदीर्घ लढा आणि योग्य दर देण्याच्या विषयावर सरकार तसेच कारखाना मालक सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा निषेध करत, शेतकरी संघटनेचे गौरवाध्यक्ष शशिकांत गुरुजी यांनी सरकारला तीव्र इशारा दिला आहे.

गुर्लापूर येथे आयोजित शेतकऱ्यांच्या आंदोलनात बोलताना शशिकांत गुरुजी म्हणाले की, महाराष्ट्राच्या धर्तीवर आपल्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही योग्य आणि न्याय्य दर मिळाला पाहिजे. दरवेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूकच होत आली आहे. आज संध्याकाळी शासकीय स्तरावर होणाऱ्या बैठकीत ऊस उत्पादकांच्या हिताच्या दृष्टीने गंभीर चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

ऊसाला योग्य दर निश्चित केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होईल असे उत्तर दिले जाऊ नये. आज संध्याकाळपर्यंत सरकारने योग्य आणि ठोस निर्णय घेतला नाही, तर रात्री ८ वाजता व्यासपीठावरूनच अधिकृत घोषणा करून उद्या संपूर्ण ‘कर्नाटक बंद’ची हाक दिली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास २८ तारखेला पक्षातीतपणे राज्यातील सर्व २२४ आमदारांच्या घरासमोर हजारोच्या संख्येने शेतकरी जाऊन हलगी वाजवून अनोखे आंदोलन करतील. आम्ही संयमाने वाट पाहत आहोत, परंतु शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याची वेळ आता आली आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा थांबणार नाही, असा इशारा शशिकांत गुरुजी यांनी दिला.

Tags: