ऊस पिकाला योग्य दर न दिल्यास आणि वजन काट्यातील फसवणूक न थांबवल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजेरी यांनी सरकार व साखर कारखानदारांना दिला आहे.
साखर कारखान्यांकडून प्रतिटन ४,५०० रुपये आणि राज्य सरकारकडून १,००० रुपये प्रोत्साहन अनुदान असे एकूण ५,५०० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. साखर कारखान्यांमध्ये होणारी वजनातील फसवणूक आणि गैरप्रकार तात्काळ थांबवले पाहिजेत, तसेच वजन काट्यांच्या जागेसाठी व पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करावा, असा आग्रह त्यांनी धरला.

सध्या शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वात गुरगुंजी येथे लाखो शेतकरी अहोरात्र आंदोलन करत असून, राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकमुखाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनात कोणतेही मतभेद नसून, यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी स्वतःला सुधारावे, असा सल्ला त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या विषयावर गंभीर निर्णय न घेतल्यास राज्यभरात उग्र स्वरूपाचे शेतकरी आंदोलन अटळ राहील, असा इशारा चुन्नप्पा पुजेरी यांनी दिला आहे.


Recent Comments