Belagavi

सुवर्णसौधमध्ये बैठकीपूर्वीच शेतकऱ्यांमध्ये राडा; दोन गटांत जोरदार हाणामारी!

Share

बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होण्यापूर्वीच शेतकरी संघटनांच्या दोन गटांत तीव्र वाद होऊन जोरदार गोंधळ उडाला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि दरनिश्चितीच्या संदर्भात बेळगावच्या सुवर्णसौध येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीचा औपचारिक प्रारंभ होण्यापूर्वीच दोन वेगवेगळ्या शेतकरी गटांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे सभागृहात उपस्थित असलेले अधिकारी व मान्यवर काही काळ घाबरून गेले. सभागृहातच दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या दोन शेतकरी नेत्यांना बळजबरीने सभागृहाबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम आणि पोलीस उपआयुक्त (DCP) नारायण बरमनी यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आणि गोंधळ शांत केला. सध्या सुवर्णसौध परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags: