Belagavi

जनकल्याणकारी योजनांसाठी सरकारकडे निधी नाही; हेलिकॉप्टर प्रवासावर कोट्यवधींचा उधळपट्टीचा खर्च

Share

राज्यात जनकल्याणकारी योजना आणि निवृत्तीवेतनासाठी निधीअभावी गरीब कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या विशेष हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासासाठी जनतेच्या करातून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी सरकारवर केला असून याप्रकरणी त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे.

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी, राज्यात जनकल्याणकारी योजना, निवृत्तीवेतन आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पुरेसा निधी वेळेवर वितरित केला जात नसल्याचा आरोप केला. विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्याने अनेक बाधित कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. मात्र, सत्ताधारी नेते जनतेच्या कराचा पैसा आलिशान प्रवासासाठी वापरत असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांच्या विशेष हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासासाठी मागील आघाडी सरकार आणि सद्य सरकारच्या कालावधीत एकूण ११६ कोटी ५५ लाख ८७ हजार ३३८ रुपये खर्च करण्यात आले आहेत, असा दावा भीमप्पा गडाद यांनी कागदपत्रे सादर करत केला. हे विमान प्रवास अधिकृत सरकारी कामासाठी झाले की खासगी आणि पक्षाच्या कामासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून सर्व कागदपत्रांसह राज्यपालांकडे तक्रार दाखल केली आहे. जर हा वापर खासगी कार्यक्रमांसाठी झाला असेल, तर तो सर्व खर्च मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून भरून द्यावा, असे भीमप्पा गडाद यांनी म्हटले.

Tags: