Belagavi

बेळगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अवमानाचा आरोप; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

Share

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील त्यांच्या पुतळ्याचा काल रात्री अवमान केल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी विविध दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त प्रकाश निकम, एसपी राम राज, डीसीपी नारायण बर्मनी, एसीपी सत्य नाईक, मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय काली मिर्ची तसेच महापालिकेच्या मुख्य अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर आणि अभियंता कालादगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घटनेची माहिती घेत संबंधित प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आली.
कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचा अवमान करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. संबंधितांवर योग्य कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या घटनेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोणत्या ही राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्याचा यापुढे अवमान सहन केला जाणार नाही. अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा मल्लेश चौगुले यांनी दिला.
उद्यानातील सुरक्षेसाठी २४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
उद्यान परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सुरक्षेसाठी वॉचमनची नियुक्ती करावी आणि बंद पडलेले दिवे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी मल्लेश चौगुले यांनी केली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उद्यानातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
विविध दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
या वेळी दलित संघटनांशी संबंधित नगरसेवक सिद्धराय मेत्री, महेश कोलकर, सिद्धाप्पा कांबळे, संतोष हलगेकर, जीवन कुरणे, बाबू पुजारी ,दीपक कांबळे, सुधीर चौगुले, संदीप कोलकर, दुर्गाप्पा कांबळे, राहुल कांबळे,यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच उद्यानातील सुरक्षा व्यवस्था सुधारावी, अशी मागणी उपस्थितांनी केली.

Tags: