बेळगावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सहाव्या दिवसाची ‘श्री दुर्गामाता दौड’ अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडली.

धर्मवीर संभाजी चौकात श्री दुर्गामाता महाआरती व प्रेरणामंत्राने दौडीचा शुभारंभ झाला. तिथून निघालेली ही मिरवणूक किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवान गल्ली, लक्ष्मी मंदिर, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, पी. बी. रोड आणि शेट्टी गल्लीसह शहरातील प्रमुख मार्गांवरून उत्साहात मार्गस्थ झाली. मार्गात महिलांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, पुष्पवृष्टी आणि औक्षण करून उपस्थितांनी दौडचे स्वागत केले.

कामत गल्लीसह विविध भागांत नागरिकांनी दौडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. गल्लीच्या मध्यभागी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करून सामूहिक आरती करण्यात आली. बालगोपाळांच्या सजीव देखाव्यांनी आणि आकर्षक वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बाल शिवाजी, आई भवानी, जोतिबा आणि नवदुर्गांच्या सजीव देखाव्यांनी उपस्थित हजारो भक्तांचे मन वेधून घेतले.

कामथ गल्ली, कसाई गल्ली, सरदार्स हायस्कूल मैदान, कॉलेज रोड मार्गे आलेली ही मिरवणूक मारुती मंदिरात पोहोचून महाआरतीने सांगता झाली. दौडच्या मार्गावर सर्वत्र शिवाजी महाराज आणि दुर्गामातेचे जयघोष दुमदुमले. नवरात्रोत्सवाच्या पुढच्या टप्प्यात उद्या रविवारी शहापूरच्या अंबाबाई मंदिराजवळून बसवेश्वर सर्कलपर्यंत ‘श्री दुर्गामाता दौड’ आयोजित करण्यात आली असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.



Recent Comments