Belagavi

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा चौथ्या दिवशी कित्तूरच्या दिशेने

Share

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा आज चौथ्या दिवशी कित्तूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

हा लढा शेतकऱ्यांच्या अस्तित्त्वाचा असल्याने सर्वांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते चन्नप्पा पुजारी यांनी केले.

एम. के. हुबळीहून कित्तूरकडे जाणारी ही पदयात्रा आज चौथ्या दिवशी पुढे निघाली. यावेळी आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पदयात्रेदरम्यान बोलताना चन्नप्पा पुजारी यांनी, तमिळनाडूच्या धर्तीवर प्रति टन उसाला १ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करावे आणि एमएसपी दरात किमान ६० रुपयांची वाढ करावी, अशी मागणी केली. तसेच मका आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून योग्य भाव मिळवून द्यावा, असे सांगितले.

उसाची विक्री करताना वजनात होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. हा शेतकऱ्यांचा लढा असून सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Tags: