Belagavi

बेळगावच्या कांगली गल्लीत शक्तीदेवता सुळेभावी श्री महालक्ष्मीचे आगमन, दसरा महोत्सवाला भव्य सुरुवात

Share

या वर्षीच्या दसरा उत्सवामुळे बेळगाव शहराला मोठा सणाचा साज चढला आहे. विशेषतः शहरात कांगली गल्लीचा दसरा महोत्सव भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. बेळगावची शक्तीदेवता सुळेभावी श्री महालक्ष्मीच्या अवतारातील दुर्गेचे हे रूप भाविकांमध्ये मोठे श्रद्धास्थान बनले आहे.

बेळगाव शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेसा असा यंदाचा दसरा महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडत आहे. शहरातील कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्या १५ व्या वर्षाच्या निमित्ताने, सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या रूपातील अत्यंत आकर्षक असा देखावा साकारण्यात आला आहे.

घटस्थापनेच्या दिवशी श्रीदेवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक अत्यंत दिमाखात काढण्यात आली. पारंपरिक वाद्यवृंद आणि लोककला पथकांच्या सादरीकरणाने या मिरवणुकीची शोभा वाढवली. लांब असलेल्या सुळेभावी येथे जाऊ न शकणाऱ्या भाविकांना स्थानिक पातळीवरच देवीचे दर्शन घेण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ललिता पंचमीला विशेष कुंकुमार्चन आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी पवित्र चंडीहोम होणार आहे. त्यादिवशी सुमारे २५ हजारांहून अधिक भाविकांसाठी भव्य महाप्रसादाची चोख व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. रविवारी आयोजित महाप्रसादात सुमारे १८ ते २० हजारांहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत.

विजयादशमीच्या दिवशी देवीच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने या महोत्सवाची सांगता होईल. कांगली गल्लीचे सचिव सदानंद हावळ आणि प्रमुख श्रद्धा बाळकृष्ण तुपेनगट्टी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी शहर व परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: