Belagavi

ऊस दर बैठकीसाठी केंद्रीय मंत्रांसहित शेतकरी दिल्लीला रवाना

Share

ऊस दरात वाढ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि एथनॉलची पूर्ण खरेदी या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होत होण्यासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघ व हसिरू सेनेचे शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

सोमवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे केंद्र सरकारने ही बैठक बोलावली आहे. उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असूनही गेल्या दहा वर्षांत एफआरपी/एमएसपीमध्ये योग्य वाढ झालेली नाही, त्यामुळे उसाला प्रतिटन योग्य दर मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

उसापासून तयार होणाऱ्या एथनॉलच्या खरेदीत सध्या अनेक अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने सर्व उत्पादित एथनॉलची १००% खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतीमालाला कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

दिल्लीतील बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास उद्याच बेळगाव-महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ५० हून अधिक प्रमुख शेतकरी प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

Tags: