लोकशाही आणि मतदानाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली.

सदाशिवनगर येथील निवासस्थानी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हा घणाघात केला. सध्या सुरू असलेली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक मतदार याद्यांची पडताळणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी मतदानाच्या हक्कासाठी आवाज उठवला असल्याचे सांगत, केंद्र सरकार राजकीय स्वार्थासाठी सामान्य मतदारांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकात १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचा गैरवापर केला जात असून अधिकाऱ्यांवर दबाव आणणे पूर्णपणे चुकीचे आहे, त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. मतदानाचा हक्क हा जगण्याच्या हक्कासमान असून यावर संसदेत व्यापक चर्चा झाली पाहिजे, असे प्रतिपादन डी. के. शिवकुमार यांनी केले.


Recent Comments