राज्यभरात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर विधान परिषदेत गंभीर चर्चा झाली. बेळगावसह विविध जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचन प्रकल्पांना होणारा उशीर याकडे आमदार एम. नागराज यादव यांनी सरकारचे लक्ष वेधले.

विधान परिषदेत बोलताना आमदार एम. नागराज यादव यांनी दुष्काळामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर संपूर्ण नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत असल्याचे सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, अथणी, रायबागसह विविध तालुक्यांत पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मका, मूग आणि सोयाबीनची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच अधिक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कळसा-भांडुरासह प्रलंबित सर्व सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने सीमावर्ती जिल्ह्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला न्यावे, असा आग्रह त्यांनी सभागृहात धरला.


Recent Comments