विधानपरिषदेच्या कामकाजात बोअरवेल खोदण्याच्या नियमांचे उल्लंघन आणि भूजल पातळी घसरण्याबाबत ज्येष्ठ सदस्य बसवराज होरट्टी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. याचवेळी गॅरंटी योजनांची अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांच्या निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

विधानपरिषदेत बोलताना बसवराज होरट्टी यांनी बोअरवेल खोदताना दोन विहिरींमधील अंतराचे नियम पाळले जात नसल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा इशारा दिला. जंगलतोड थांबवणे, दुष्काळाचा सामना करण्यासाठी चेक डॅम उभारणीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांमध्ये एकपीक पद्धतीचे दुष्परिणाम पटवून देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच गॅरंटी योजना केवळ पैशांचे वाटप न ठरता त्या खऱ्या गरजूंनाच देऊन त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण केली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

यावर पलटवार करताना आमदार नागराज यादव यांनी गॅरंटी योजनांकडे तुच्छतेने पाहू नये, असे सांगितले. युवनिधी योजनेमुळे युवकांचे सक्षमीकरण होत असून गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत दिले जाणारे २००० रुपये दारिद्र्य निर्मूलनाच्या उद्देशाने दिले जात आहेत, त्यामुळे लोककल्याणकारी योजनांची टवाळी करू नये, असा बचाव त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वतीने केला. यावर केवळ पैसे न देता त्यासोबत जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, असे प्रतिपादन होरट्टी यांनी शेवटी केले.


Recent Comments