Chikkodi

कार आणि डंपरच्या अपघातात निवृत्त मुख्याध्यापकांचा मृत्यू

Share

चिकोडी तालुक्यातील हत्तरवाट क्रॉसजवळ कार आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निवृत्त मुख्याध्यापकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

करोशी येथील रहिवासी निवृत्त मुख्याध्यापक अब्दुल सत्तार पटेल (वय ७८) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मुलगा मौलाना नोमान पटेल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अब्दुल सत्तार पटेल आणि त्यांचा मुलगा मौलाना नोमान पटेल हे स्वतःच्या कारने कोल्हापूरहून करोशी गावाकडे परतत होते. चिकोडी-बेळगाव रस्त्यावरील हत्तरवाट क्रॉसजवळ आले असता समोरून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला धडक दिली.

या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ चिकोडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अब्दुल सत्तार पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जखमी मुलगा मौलाना नोमान याच्यावर चिकोडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत अब्दुल सत्तार पटेल यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर करोशी या स्वग्रामी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: