Chikkodi

अघोषित वीज कपातीविरोधात करोशीत शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

कर्नाटक सरकारकडून विविध ठिकाणी अघोषित वीज कपातीविरोधात आंदोलन सुरू असून, याच पार्श्वभूमीवर चिकोडी तालुक्यातील करोशी गावातील शेतातील घरांना वीजपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण केंद्राला घेराव घालून सुमारे पाच तास धरणे आंदोलन केले.

गावातील घरांना नियमित वीजपुरवठा होत असला तरी शेतातील घरांना रात्रीच्या वेळी वीज दिली जात नाही. पूर्वी रात्री ४ तास आणि दिवसा ३ तास थ्री-फेज वीजपुरवठा केला जात होता. मात्र, अलीकडे रात्रीची वीज पूर्णपणे खंडित केली जात असल्याने शेतकऱ्यांना अंधारात राहावे लागत आहे.

अघोषित वीज कपातीमुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून पिके वाळू लागली आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. शेतातील घरांमध्ये जनावरे आणि विजेची उपकरणे चोरीला जाण्याच्या घटना वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. इतर भागांत वीजपुरवठा सुरू असताना शेतातील घरांबाबतच भेदभाव का, असा सवाल आंदोलकांनी केला.

आंदोलनानंतर विभागाचे अधिकारी आर. बी. कुंभार आणि कनिष्ठ अभियंता कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. सुरक्षेच्या कारणास्तव एएसआय मुर्नाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता.

या आंदोलनात मल्लिकाअर्जुन सेवकरी, सुनील हरिश्चंद्र शेंडुरे, अण्णाप्पा निर्वाणी, जीवन पवार, सुनील तुकाराम शेंडुरे, शिवानंद केस्ती, महेश चौडन्नवर, विजय कोरे, एकनाथ बिद्रे, जोतिबा सुळकुडे, किरण शिंगाई यांच्यासह दोनशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

Tags: