Belagavi

महिला सक्षम झाल्या तरच समाज बळकट; कारंजीमठातील कार्यक्रमात गुरुसिद्ध स्वामीजींचे प्रतिपादन

Share

महिला सक्षम झाल्या तरच कुटुंब, समाज आणि देश अधिक मजबूत होऊ शकतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना समानतेने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन कारंजीमठाचे पूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी केले. बेळगाव येथील कारंजीमठ येथे आयोजित महिला मेळावा व शिवानुभव कार्यक्रमात ते बोलत होते.

बेळगावच्या कारंजीमठ येथे ७ सप्टेंबर रोजी महिला मेळावा व शिवानुभव कार्यक्रम पार पडला. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सातत्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे स्वामीजींनी सांगितले. विशेष व्याख्यात्या प्रा. वसंतगीता हिरेमठ यांनी बसवादी शिवशरण यांच्या वचनांचे खरे मर्म समजून घेऊन ते जीवनात उतरवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्या प्रा. पद्मा कुलकर्णी होत्या.

या प्रसंगी लिंगायत महिला समाजाच्या संस्थापक अध्यक्षा शैलजा भिंगे यांच्या अमृताभिनंदन सोहळ्यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘रंगसंपदा’च्या माध्यमातून बेळगावात ‘नीलांबिके’ नाटकाचे प्रयोग यशस्वी करणाऱ्या डॉ. अरविंद कुलकर्णी, प्रा. पद्मा कुलकर्णी, डॉ. निर्मला पट्टण, डॉ. दुर्गा नाडकर्णी, आर. टी. शरण, प्रसाद कारजोळ आणि स्नेहा कुलकर्णी यांचा मठाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात अश्विनी असुंडी आणि ज्योती बिरादार यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. कुमारेश्वर संगीत पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. या सोहळ्यास नीलगंगा चरंतीमठ, रत्नप्रभा बेल्लद, शिरीष जोशी, व्ही. के. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: