शिक्षणासोबतच सुदृढ आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून, शारीरिक आरोग्यासाठी विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे, असे प्रतिपादन सीटीई संस्थेचे उपाध्यक्ष विजय मांजरेकर यांनी केले.


चिक्कोडी येथील सीटीई संस्थेच्या श्रीमती अहिल्याबाई पाटील कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात नवाने सुरू करण्यात आलेल्या ‘श्रीमती कमला शेडबाळ क्रिकेट अकादमी’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


संस्थेच्या माजी कर्मचारी श्रीमती कमला शेडबाळ यांनी क्रिकेट अकादमीच्या उभारणीसाठी दिलेल्या २ लाख रुपयांच्या देणगीतून ही अकादमी सुरू करण्यात आली आहे. येथे प्रशिक्षित प्रशिक्षकांची नियुक्ती करून महाविद्यालयातील विद्यार्थिनींसह शहरातील तरुणींना दर्जेदार प्रशिक्षण दिले जाईल. या सुविधेचा लाभ घेऊन ग्रामीण भागातून सक्षम महिला क्रिकेटपटू आकाराला याव्यात, अशी अपेक्षा विजय मांजरेकर यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात बोलताना संचालक संजय आडके यांनी, धावपळीच्या जीवनशैलीत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळ आणि व्यायामालाही महत्त्व दिले पाहिजे, असे सांगत ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असल्याचे अधोरेखित केले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव अरुण कुलकर्णी, संचालक पी. व्ही. शेडबाळ, वाय. एस. मिरजी, ओंकार कुलकर्णी, सहसचिव मिथुन देशपांडे, प्राचार्य एस. सी. जकाती, जयश्री शेडबाळ, विजय बिक्कणवर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उत्तम शिंदे, डॉ. एच. ए. भोगले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments