Belagavi

पाण्यासाठी श्रीनगरवासीयांचा महापालिकेवर रिकाम्या घागरींसह मोर्चा

Share

गेल्या १० ते १२ दिवसांपासून थेंबभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या बेळगावातील श्रीनगर, वंटमुरी कॉलनी आणि माळमारुती परिसरातील रहिवाशांनी आज महापालिकेवर रिकामे हंडे घेऊन धडक मारली. करवसुलीत तत्परता दाखवणारे अधिकारी पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बेळगाव शहरातील श्रीनगर, वंटमुरी कॉलनी, माळमारुती आणि महांतेश नगर या भागात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. २४ तास पाणी देण्याचे आश्वासन देऊन कनेक्शन देण्यात आले; मात्र आता पाण्याचा थेंबही मिळत नसल्याने महिला व ज्येष्ठांचे हाल होत आहेत.

पाण्याच्या तीव्र टंचाईसोबतच या भागात रस्त्यांची चाळण झाली असून सांडपाण्याची आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. गणेशोत्सव सण तोंडावर आलेला असतानाही महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

नागरिकांनी तक्रार करण्यासाठी फोन केल्यास अधिकारी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेतात. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः भेट देऊन रस्ते, गटारी आणि पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली. येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अकीला पठाण यांनी दिला.

Tags: