Belagavi

‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’पर्यंत बेळगावच्या अभियंत्याची मजल

Share

राष्ट्रीय महामार्गावरील एका चहाच्या दुकानात लिहिलेल्या सुविचारापासून प्रेरणा घेऊन बेळगावच्या एका अभियंत्याने कन्नड भाषेत तब्बल १० हजार सुविचार लिहून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव नोंदवले आहे.

बेळगाव येथील गूड्स शेड रोडचे रहिवासी गोपाळ रंगराव देशपांडे यांनी ही कामगिरी केली आहे. हुदली गावचे मूळ रहिवासी असलेल्या गोपाळ यांनी कन्नड माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मच्छे येथील एका खासगी कंपनीत मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत असून, व्यावसायिक व्यस्ततेतही त्यांनी कन्नड भाषेवरील आपले प्रेम जपले आहे.

वर्ष २०२३ मध्ये बंगळुरूकडे जाताना महामार्गावरील एका चहाच्या दुकानात लिहिलेला सुविचार पाहून गोपाळ देशपांडे यांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वतः दररोज प्रेरणादायी विचार लिहिण्यास सुरुवात केली. तरुणांमध्ये विचारशक्ती कमी होत असून त्यांनी वाचनाची सवय वाढवावी, असे मत गोपाळ देशपांडे यांनी व्यक्त केले.

सहा डायऱ्यांमधील १,४३० पानांचे हस्तलिखित संकलित करून त्यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडे पाठवले होते. त्याची पडताळणी आणि मुलाखतीनंतर कन्नड भाषेत १० हजार सुविचार लिहिणाऱ्या गोपाळ देशपांडे यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली.

Tags: