येळळूर : श्री. प्रकाश निकम यांनी बेळगाव शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणे ही संपूर्ण बेळगाव नगरीसाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आणि उत्साहवर्धक बाब असल्याची भावना येळळूर गावातील नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

सन २०१४ मध्ये बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रकाश निकम यांनी आपल्या कार्यतत्परतेने आणि प्रभावी कार्यपद्धतीने नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या काळात येळळूर गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले होते.

आज ते बेळगावचे पोलीस आयुक्त म्हणून पुन्हा बेळगावच्या सेवेत रुजू झाल्याने येळळूर गावातील नागरिकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून बेळगाव ग्रामीण परिसरात कार्यरत असतानाचा त्यांचा काळ आणि येळळूर गावातील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी दिलेली उपस्थिती आजही अनेक ग्रामस्थांच्या स्मरणात आहे.
बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या, वाहतूक व्यवस्था, सामाजिक सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
बेळगावकर आजही माजी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या कार्यकाळातील शिस्त, सुरक्षितता आणि प्रभावी कायदा-सुव्यवस्थेची आठवण ठेवतात. त्याच धर्तीवर, किंबहुना त्याहून अधिक प्रभावीपणे बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी प्रकाश निकम निश्चितच बसवतील, असा विश्वास येळळूर गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रकाश निकम यांच्या नियुक्तीमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून शांतता व सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून श्री. प्रकाश निकम यांच्या नवीन कार्यकाळासाठी येळळूर गावच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहर शांततामय, सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहो, अशा हार्दिक शुभेच्छा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यावेळी विलास घाडी सर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील मनोहर सिद्धाप्पा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर मनोहर अ पाटील मल्लाप्पा काक्तीकर निखिल पाटील सिद्धार्थ पाटील मधु नंदुरकर उपस्थित होते


Recent Comments