निपाणी जवळील प्रसिद्ध स्तवनिधी घाटाजवळ एका व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी येथील रहिवासी महंमद समशेर खलीफ (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत महंमद हे स्थानिक अप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

बुधवारी सकाळी स्तवनिधी घाटाजवळून जाणाऱ्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
मोठ्या दगडाने तोंडावर आणि डोक्यावर गंभीर वार करून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
हत्येचे वृत्त समजताच मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.
या प्रकरणी मृताची पत्नी नसीमा यांनी दिलेल्या तक्रारीवरून निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.


Recent Comments