Vijayapura

विजापुरात अनधिकृत पीजी आणि अभ्यासिकांवर कडक कारवाईची मागणी

Share

विजापूर शहर व जिल्ह्यात परवाना न घेता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून चालवल्या जाणाऱ्या अनाधिकृत पीजी तसेच खाजगी अभ्यासिकांवर (स्टडी लायब्ररी) कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अशोक धाम फाउंडेशनने केली आहे.

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शहरात शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचा गैरफायदा घेऊन अनेक अनाधिकृत पीजी व अभ्यासिका सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महानगरपालिकेचे माजी सदस्य प्रकाश मिरजी यांनी सांगितले की, बहुतांश पीजी व अभ्यासिकांकडे पालिकेचा परवाना नाही. अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC), आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्याचा मार्ग आणि किमान सुरक्षा व्यवस्था नसलेल्या अरुंद इमारतींमध्ये हे व्यवसाय चालवले जात आहेत.

तर शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष संगमेश सागर म्हणाले की, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि नोंदवही (रजिस्टर) नसल्याने विद्यार्थी व तरुणींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका, पोलीस आणि अग्निशामक दलाने संयुक्त तपासणी मोहीम राबवून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी अशोक धाम फाउंडेशनचे पदाधिकारी मधुरा, शशीधर, अभिलाष, लखन आणि विश्वाराध्य वालीकार उपस्थित होते.

Tags: