बेळगाव हे कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव संमत न करणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेच्या भूमिकेला विरोध दर्शवत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (प्रवीण शेट्टी गट) कार्यकर्त्यांनी बेळगावात माकड उड्या मारत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला.

‘करवे’चे जिल्हाध्यक्ष अभिलाष यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन करत महापालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आत घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. यादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

बेळगाव हे कर्नाटकाचा भाग असल्याचा ठराव मांडण्यास महापालिकेने नकार दिल्याने ‘करवे’कडून उर बडवून घेण्याचे काम सुरू आहे मराठीभाषिकांचे प्राबल्य असलेल्या आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या महापालिकेला बरखास्त करून पुन्हा निवडणुका घेण्याची बिनबुडाची मागणी अभिलाष यांनी केली.

प्रादेशिक आयुक्तांनी दिलेल्या नोटीस आणि अहवालाचे समर्थन करत, सरकारने कारवाई न केल्यास एका आठवड्यात तीव्र आंदोलन उभारण्याच्या पोकळ वल्गना त्यांनी केल्या.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू असलेले हे नाटकी आंदोलन प्रशासनासहित पोलीस विभागाला ही वेठिला धरत असल्याचा प्रकार आहे अशी चर्चा रंगू लागली आहे.


Recent Comments