चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावात अनैतिक संबंधातून पतीची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याच्या प्रकरणात, मृतदेह बाहेर काढताना तालुका प्रशासन आणि पोलीस विभागाने अंधश्रद्धेचा अवलंब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

खडकलाट येथील रहिवासी राघू गावडे (वय ४०) यांची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात पुरला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी मृतदेह बाहेर काढण्यासाठी चिक्कोडीचे साहाय्यक आयुक्त (एसी) एस. एस. संपगावी यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

विज्ञानाच्या युगात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या यंत्रणेकडूनच अंधश्रद्धेचा आधार घेतला गेल्याची चर्चा सुरू आहे. शेतात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यापूर्वी प्राण्यांचा (कोंबडीचा) बळी देऊन मगच कारवाई करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.
मृतदेह उकरण्यापूर्वी त्या ठिकाणी कोंबडीचा बळी देण्याची सर्व तयारी पोलिसांनी केली होती. मात्र, उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी या प्रकाराचे चित्रीकरण करण्यास सुरुवात करताच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी आपला बेत बदलला. बळी देण्यासाठी कोंबडी आणलेली व्यक्ती तत्काळ तेथून निघून गेली.
नागरिकांमध्ये जनजागृती करायची सोडून शासकीय विभागांनीच अशा अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीमुळे ऐनवेळी हा प्रकार रोखला गेला.
डी. के. उप्पार
इन न्यूज, चिक्कोडी


Recent Comments