कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळात झालेल्या १८७ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप असलेले बी. नागेंद्र यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राज्य भाजप अनुसूचित जमाती आघाडीचे सरचिटणीस बसवराज हुंद्री यांनी दिला आहे.

चिक्कोडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. अनुसूचित जमातीतील गरीब जनतेच्या कल्याणासाठी राखीव असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी लुटल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करून, राज्य सरकारने अनुसूचित जमाती समाजाचा थेट विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

यापूर्वी सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात असताना नागेंद्र यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. मात्र, आता डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नागेंद्र यांना पुन्हा मंत्रीपद देणे अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाहीविरोधी आहे, अशी टीका बसवराज हुंद्री यांनी केली.
त्यानंतर बोलताना चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश अप्पाजीगोळ यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री नागेंद्र यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी चिक्कोडी जिल्हा मुख्यालयात भाजपकडून लवकरच भव्य निदर्शने आयोजित केली जातील, असे सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा सरचिटणीस अमृत कुलकर्णी, नेते अप्पय्या जाजरी, प्रवीण केम्पवाडे, यल्लाप्पा नाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments