Belagavi

जुने बेळगावमधील धोकादायक पाण्याची टाकी हटविण्यास प्रारंभ

Share

जुने बेळगाव येथील मराठी मुला-मुलींच्या शाळा क्रमांक ३३ च्या आवारात असलेली धोकादायक पाण्याची टाकी हटवण्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून बिगरवापर असलेली ही जीर्ण टाकी कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती.

ही जीर्ण पाण्याची टाकी हटवण्यात यावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती (SDMC), स्थानिक तरुण आणि माजी विद्यार्थ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून टाकी पाडण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा गंभीर प्रश्न अखेर सुटल्याने शालेय विद्यार्थी, पालक आणि जुने बेळगावच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि माध्यमांचे नागरिक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने आभार मानले आहेत.

Tags: