केएलई संस्थेच्या लिंगराज कॉलेजमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे उद्घाटन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडले.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मनपा महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय, शिस्त, वेळेचे भान आणि सतत परिश्रम करण्याचे तत्त्व अंगीकारल्यास यश नक्कीच मिळते. समाज नेहमी कर्तृत्ववान व्यक्तींचीच दखल घेतो; त्यामुळे अभ्यासासोबतच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.


या प्रसंगी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘डीजी एनसीसी’ राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणारा योगराज रामगोनगट्टी, राष्ट्रीय ज्युनिअर अंडर-२० ॲथलेटिक्सच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक मिळवणारी अपूर्वा नाईक आणि भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी भव्या सी. जे. यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमनी होते. लिंगराज ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या गिरिज्जा हिरेमठ यांनी स्वागत केले, तर इंग्रजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सारिका नागरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सी. रामराव यांनी आभार मानले. या वेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments