बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील एका संस्थेत सुमारे १.९६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि फसवणूक झाल्याप्रकरणी संस्थेचे माजी सचिव भुजंग केदारी जोयी यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

संस्थेचे माजी सचिव भुजंग जोयी यांनी २००३ ते २०२३ या काळात पदाचा गैरवापर करून १९ सभासदांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला. त्यांनी अध्यक्षांची बनावट सही करून एका खाजगी व्यक्तीकडे गहाण ठेवत ५९.१२ लाख रुपयांचे कर्ज वैयक्तिक खात्यावर वळवले.

त्याचप्रमाणे चार भागधारकांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून कांग्राळी येथील भागोदय सोसायटीकडून ४८.५५ लाख रुपये उकळल्याचाही आरोप आहे. तसेच पत्नी, बहीण आणि भावाच्या नावे कर्ज मंजूर करून ७१.४२ लाख रुपये स्वतःसाठी वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे.
इतर सभासदांकडून हप्त्याचे १.२२ लाख रुपये घेऊन गैरव्यवहार करणे आणि संस्थेची कागदपत्रे गहाण ठेवून स्वतःच्या नावे १५.९९ लाख रुपयांचे कर्ज काढल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले.


Recent Comments