बेळगाव येथील गणेशपूरच्या एका नागरिकाची ऑनलाईन रिफंडच्या बहाण्याने १ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली असून, सीईएन पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही रक्कम यशस्वीरीत्या फ्रीज केली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

गणेशपूरच्या नागरिकाला ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू न मिळता भलतीच वस्तू मिळाली होती. ती परत करण्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी रिफंडच्या नावाखाली बँक खात्याची माहिती घेऊन भामट्यांनी यूपीआयद्वारे टप्प्याटप्प्याने १ लाख रुपये लांबवले.

घटनेची माहिती मिळताच सीईएन पोलिसांनी ही रक्कम तात्काळ फ्रीज केली असून, पीडित नागरिक न्यायालयाच्या प्रक्रियेद्वारे आपली रक्कम परत मिळवू शकतात, असे सांगत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना अशा सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले.


Recent Comments