पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे यांचा बेळगावातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने माहेश्वरी अंध शाळेत सत्कार करण्यात आला.

बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या बेळगावातील विविध संस्थांनी एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये शांताई वृद्धाश्रम, स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान, समृद्ध, माहेश्वरी अंध शाळा, आर्ष विद्या गुरुकुलम्, महेश फाउंडेशन, आश्रय फाउंडेशन, नंदन मक्कल धाम, करूनालय, एनएसएसटी वृद्धाश्रम, जीवन आधार फाउंडेशन आणि स्नेहालय यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी महापौर विजय मोरे यांनी डॉ. कोरे यांच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. तर अध्यक्षीय भाषणात चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी केएलई संस्थेच्या माध्यमातून डॉ. कोरे यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.

गेल्या चार दशकांपासून शिक्षण आणि आरोग्य सुविधा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात डॉ. कोरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिल्याचे मत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. केएलई संस्थेच्या माध्यमातून बेळगाव आणि परिसरातील अनेक स्वयंसेवी संस्थांना त्यांनी वेळोवेळी पाठबळ आणि मार्गदर्शन दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सत्कार स्वीकारल्यानंतर पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी राणी नागरत्ना यांनी आभार मानले. उपस्थितांनी डॉ. कोरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Recent Comments