Vijayapura

कृष्णा नदीच्या उगमस्थळी गंगापूजन

Share

महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात कृष्णा नदीच्या उगमस्थळी २५ वी गंगापूजा करून उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांनी कृष्णामाईचे जलपूजन केले. माजी मंत्री संगण्णा बेळ्ळुब्बी यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक विधी पार पडला.

महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे उत्तर कर्नाटकाची जीवन वाहिनी असलेली कृष्णा नदी पूर्ण भरून वाहत आहे. विजापूर, बागलकोट, यादगीर, कलबुर्गी आणि रायचूर जिल्ह्यातील लाखो लोकांना पाणी देणाऱ्या कृष्णा नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्तर कर्नाटकातील शेतकरी दरवर्षी महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात येतात. गुरुपौर्णिमेनिमित्त संगण्णा बेळ्ळुब्बी यांच्यासह १०० हून अधिक शेतकरी, महिला व भाविकांनी येथे विशेष पूजा करून चांगला पाऊस आणि समृद्ध शेतीसाठी प्रार्थना केली.

पंचगंगा हे क्षेत्र कृष्णा, गायत्री, सावित्री, कोयना आणि वेन्ना या पाच नद्यांचे उगमस्थान मानले जाते. संगण्णा बेळ्ळुब्बी यांनी आमदार असताना ही परंपरा सुरू केली होती. यंदा २५ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नी आणि कोल्हार हिरमठाचे श्री कैलासनाथ शिवाचार्य स्वामीजी यांच्यासह ही पूजा पूर्ण केली. मुसळधार पाऊस असतानाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजेत सहभाग घेतला, असे माजी मंत्री संगण्णा बेळ्ळुब्बी यांनी सांगितले.

या गंगापूजेला भाजप जिल्हाध्यक्ष जी. डी. अंगडी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष बिरादार यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने चालणारी ही परंपरा उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांचे निसर्गाशी असलेले भावनिक नाते दर्शवणारी ठरली आहे.

विजयकुमार सारवाड
विजापूर

Tags: