Belagavi

क्रीडा स्पर्धांतील वयोमर्यादा गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

शालेय तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या वयोमर्यादेची काटेकोर पडताळणी करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील सांब्रा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

शालेय, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये काही स्पर्धक बनावट जन्मदाखले आणि चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे वयोमर्यादा नियमांचे उल्लंघन करून सहभागी होत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र आणि गुणवंत खेळाडूंवर अन्याय होत असून, क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता आणि निष्पक्ष स्पर्धेलाही धक्का बसत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

महाराष्ट्र शासनाने संशयास्पद प्रकरणांमध्ये वय पडताळणी चाचणी आणि कागदपत्रांची तपासणी सक्तीची केली आहे. त्याच धर्तीवर बेळगाव जिल्ह्यातही अशीच कठोर यंत्रणा लागू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

सर्व खेळाडूंचे जन्मदाखले, आधार कार्ड आणि शालेय नोंदींची सखोल पडताळणी करावी. वयाबाबत संशय असलेल्या खेळाडूंची वय पडताळणी चाचणी अनिवार्य करावी. बनावट कागदपत्रांच्या आधारे स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि स्पर्धा आयोजकांनी या नियमांचे पालन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या उपाययोजनांमुळे क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता वाढून पात्र आणि गुणवंत खेळाडूंना न्याय मिळेल तसेच क्रीडा स्पर्धांची विश्वासार्हता अधिक बळकट होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी वासुदेव पाटील, कुमार हुब्बळीकर, सोमनाथ घंटेकर, सुधीर मलायी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: