Belagavi

राकसकोप्प जलाशय तुडुंब : बेळगावकरांना मोठा दिलासा

Share

बेळगाव शहराचा प्रमुख पाणी स्रोत असलेला राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. तिलारी जलसंधारण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून, पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तिलारी परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. मंगळवार रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाले. मंगळवारपर्यंत जलाशय पूर्ण भरण्यासाठी केवळ दोन फूट पाण्याची आवश्यकता होती.

जलाशयाची सुरक्षितता आणि क्रस्ट गेटची कार्यक्षमता तपासण्यासाठी सध्या गेट १ ते २ इंच उघडून प्रायोगिक स्वरूपात पाणी सोडण्यात येत आहे. ही नियमित देखभाल प्रक्रियेचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार राकसकोप्प जलाशय आहे. गेल्या काही महिन्यांत जलसाठा कमी झाल्याने महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाला वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, आता जलाशय भरल्याने आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून पाण्याच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Tags: