गणेशोत्सवाला दीड महिना शिल्लक असतानाच बेळगाव शहर पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मूर्तिकारांच्या कार्यशाळांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या.


गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान येणारे तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवारी रात्री शहरातील विविध गणेश मूर्ती कार्यशाळांना भेट दिली. रात्री ७ ते १० या वेळेत येडियुरप्पा रोड, अनगोळ, मुतगा आणि गुड्सशेड रोड परिसरातील मूर्तिकारांकडील मूर्तींची त्यांनी पाहणी केली.


यावेळी सुमारे २०० हून अधिक गणेशमूर्तींची उंची आणि रचना तपासण्यात आली. मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा त्या टाळण्यासाठी आतापासून नियोजन सुरू करण्यात आले आहे. मूर्तिकारांना मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तांत्रिक सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले.
शहापूर, खडेबाजार, एपीएमसी यासह विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. पोलीस विभागाच्या या नियोजनात्मक उपक्रमाला मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांकडून सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली.


Recent Comments