Uncategorized

हिंदू धर्मरक्षणासाठी पुजारी समाजाशी जोडणारा दुवा ठरावा :श्री बसवमूर्ती मदारचन्नय्या स्वामीजी

Share

बेळगाव येथे आयोजित पुजारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी चित्रदुर्ग येथील मदार चन्नय्या गुरुपीठाचे श्री बसवमूर्ती मदारचन्नय्या स्वामीजी यांनी पुजाऱ्यांनी देव आणि भक्त यांच्यातील संबंध अधिक दृढ करून हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी काम करावे, असे आवाहन केले.

बेळगावच्या लक्ष्मी टेकडी येथे आयोजित पुजारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना बसवमूर्ती मदारचन्नय्या स्वामीजी म्हणाले की, मंदिरे ही सामाजिक परिवर्तनाची केंद्रे असून पुजाऱ्यांनी भक्तांकडे समानतेने पाहत भेदभावाला थारा देऊ नये; कारण मंदिरांमधील भेदभावामुळेच धर्मांतरासारखे प्रश्न उपस्थित होतात. हुकेरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस चाललेल्या या शिबिराच्या माध्यमातून पुजाऱ्यांनी मंदिर व भक्त यांच्यातील दुवा म्हणून प्रभावी जबाबदारी पार पाडत समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सर्व घटकांना एकत्र घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाड यांनी मंदिरे ही केवळ धार्मिक केंद्र न राहता सामाजिक कार्याची केंद्रे बनली पाहिजेत असे मत व्यक्त केले असून, पुजाऱ्यांनी केवळ पूजा न करता भक्तांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना समाधान मिळवून द्यावे आणि देवालय संवर्धन समितीचे प्रशिक्षण शिबिर पुढेही सुरू ठेवावे, असे आवाहन केले.

हुकेरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी पुजाऱ्यांनी सर्वांवर प्रेम करण्याचे आवाहन करत, भेदभाव करणारी व्यक्ती कधीही खरा पुजारी होऊ शकत नाही असे स्पष्ट केले . प्रशिक्षण घेतलेल्या पुजाऱ्यांनी समाजात आदर्श प्रस्थापित करून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला कर्नाटक देवालय संवर्धन समितीचे अध्यक्ष मनोहर मठद, विजयकुमार पाटील, अशोक शिरूर, सोमशेखर हिरेमठ, सतीश माळोदय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: