बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील उळागड्डीवाडी येथील सून शिल्पा सुरेश खोत यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा गावात नागरी सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्यात बोलताना प्रमुख पाहुण्या स्वप्नाली गणेश हुक्केरी यांनी, यशासाठी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सांगत शिल्पा खोत यांच्या यशात त्यांचे कष्ट आणि पती सुरेश खोत यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना पीएसआय शिल्पा खोत यांनी, १९९३ पासून पोलीस दलात सेवा बजावत असून कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. तसेच आजच्या तरुण पिढीने मोबाईलच्या मोहात न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले आयुष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सद्लगा येथील गीताश्रमाचे श्रद्धानंद स्वामीजी आणि चिंचणी येथील शिवप्रसाद देवरू यांनी शिल्पा खोत यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. यासोबतच दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजित कदम आणि काँग्रेस नेते रवी मिर्जे यांच्यासह उपस्थित मान्यवराने त्यांच्या सेवेची प्रशंसा केली.

या सोहळ्याला नीलांबिका प्रकाश हुक्केरी, उत्तम पटेल, महावीर मोहिते, सुभाष कात्राळे, तात्यासाहेब काटे, अण्णा इंगळे, शेखर पाटील, वासंती खोत, राजेंद्र कराळे, मल्लिकार्जुन पाटील, श्याम रेवडे, किरण माळी, प्रकाश वंटमुते, अश्वथ शितोळे, मारुती माने, प्रभाकर खोत आणि महेश खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments