Belagavi

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक

Share

पत्रकार आणि पोलिस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या चौघांच्या टोळीचा हुकेरी पोलिसांनी पर्दाफाश केला. गांजाच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत एका व्यक्तीकडून ₹६० हजार उकळल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.

बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांची नावे कल्लप्पा माळज, मल्लिकार्जुन जुल्फी, पृथ्वीराज चौहान आणि डेव्हिड तंगेराळ अशी आहेत. त्यांनी कोटबागी येथील महिबूब यांना जबरदस्तीने गांजा देऊन स्वतःला पोलीस व पत्रकार असल्याचे सांगत व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर तुरुंगात पाठविण्याची धमकी देत सुरुवातीला ₹२ ते ₹३ लाखांची मागणी केली.

अखेर तडजोडीअंती ₹६० हजार उकळल्यानंतर संबंधित व्हिडिओ ‘जीडी टीव्ही’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला. याप्रकरणी हुकेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीपीआय एस. आर. गणाचारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव येथे कारवाई करून चौघांना अटक केली.

आरोपींकडून एक मारुती एर्टिगा कार, एक दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि ₹३४ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Tags: