Chikkodi

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या चिक्कोडी जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड

Share

कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरू सेनेच्या (मेटी गट) बैठकीत चिक्कोडी जिल्हा व विविध तालुक्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव मेटी यांनी केली आहे.

चिक्कोडी येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये चिक्कोडी जिल्हाध्यक्षपदी पुट्टू खानापुरे, जिल्हा उपाध्यक्षपदी शंकरगौडा पाटील, कार्याध्यक्षपदी ज्योती केंपत्ती, चिक्कोडी तालुकाध्यक्षपदी काशिनाथ कुरणे, रायबाग तालुकाध्यक्षपदी अशोक नाईक आणि रायबाग तालुका उपाध्यक्षपदी श्रीशैल कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष वासुदेव मेटी यांनी सांगितले की, सध्या राज्यातील शेतकरी अनेक गंभीर समस्यांचा सामना करत आहेत. या संकटामधून मार्ग काढण्यासाठी आणि योग्य तो तोडगा शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पुट्टू खानापुरे यांनी, संघटना ग्रामीण पातळीपर्यंत विस्तारणे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज बनून त्यांना योग्य पाठबळ देणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे स्पष्ट केले. तर चिक्कोडीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कुरणे यांनी, शेतकऱ्यांच्या अडीअडचणींना प्रामाणिकपणे न्याय देणे हाच संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

या बैठकीला राज्य समिती सदस्य सुरेशगौडा पाटील, बसवराज कपरट्टी महास्वामीजी, राज्य महिला सचिव कमला पाटील, सदाशिव मुरगुडे, शंकर निडगुंदी, विठ्ठल मदिहळ्ळी, पुंडलिक केंपवगोळ, दानेश्वरी मुदळगी यांच्यासह संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: