Belagavi

बेळगावच्या चव्हाट गल्लीत तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक संतप्त

Share

बेळगावमधील चव्हाट गल्ली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून उद्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चव्हाट गल्ली येथे पाईपलाईन खराब झाल्यामुळे पाण्याचे मोठे संकट ओढावले आहे. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले असून त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.

राकसकोप जलाशयात पुरेसा पाणीसाठा असतानाही चव्हाट गल्लीत नियमित पाणी पुरवठा केला जात नसल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. महापालिकेकडून टँकरने पाणी पुरवले जात असले, तरी नोकरदार आणि वृद्ध व्यक्तींना टँकरचे पाणी भरणे अत्यंत कष्टाचे ठरत आहे. त्यामुळे टँकरऐवजी पाईपलाईनद्वारेच नियमित पाणी देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.

या समस्येबाबत महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सातत्याने तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिका अधिकारी, खाजगी कंपन्या आणि संबंधित संस्था यांच्यात समन्वय नसल्याने कंत्राटदारांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्यानेच पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे जलमंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंत्राटदार आणि खाजगी कंपन्या परस्परांवर जबाबदारी ढकलत असल्याने स्थानिक नागरिक मात्र पाण्यासाठी भरडले जात आहेत. प्रशासकीय अनास्थेमुळे निर्माण झालेली ही समस्या उद्यापर्यंत न सुटल्यास पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Tags: