येळ्ळूर भागातील शिवारातील रस्त्यांच्या दुरावस्थेसह विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले.

येळ्ळूर शिवारातील रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतरस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि गावातील नागरी समस्या सोडवण्याबाबत येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले आहे.

सध्या शेतीची कामे जोमात सुरू असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पी डी ओ यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी समितीने केली आहे.
यासोबतच गावातील गोडी विहीर, माणग्याची विहीर, बाराभाव विहीर आणि इंदिरा नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छता करावी. गावातील लक्ष्मी तलाव, फुटूक तलाव आणि मंगाई तलावात पावसाचे पाणी वळवून पाण्याचा साठा करावा, तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गटारी साफ कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवाजी विद्यालयासमोर असलेला जीर्ण वृक्ष संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित हटवावा, अशी मागणी करत हे निवेदन ग्रामपंचायतीचे सचिव सदानंद मराठे यांना देण्यात आले.
यावेळी येळ्ळूर म.ए. समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, राजू पावले, नागेंद्र पाखरे, सुरज गोरल, यलुपा पाटील, शिवाजी कदम, शिवाजी पाटील, रमेश धामणेकर, नेताजी गोरल, सतीश देसूरकर, बाळकृष्ण पाटील, प्रकाश सायनेकर, शिवाजी गोरल, कृष्णा शहापूरकर, भरमाण्णा मंगणाकर आणि भुजंग संभाजीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments